|| दत्त येवुनिया उभा ठाकला ||
श्री दत्तात्रय हे आमच्या घरातील प्रमुख आराध्य दैवतांपैकी एक.
आईचा प्रत्येक गुरुवारी उपवास असतो. दिवस भरातल्या कामांमधून वेळ काढून ती प्रत्येक गुरुवारी दत्तात्रयाच्या मंदिरात दर्शनाला जाते.
माझे वडील प्रत्येक गुरुवारी सर्व प्रथम सातारा शहरातल्या आनंदवाडी दत्त मंदिरात जातात, मग दिवसाला सुरुवात करतात.
या पार्श्वभूमीवर हा अनुभव वाचाल तर तुम्हा सर्वांना देखील यातली श्रद्धा, यातली भक्ती, यातली प्रचीती, यातली अनुभूती चमत्कार वाटेल, साक्षात्कार वाटेल.
तर अनुभूती आहे सिंगापूर मधली. घरापासून लांब एका घरामधली.
आट पाट नगर आहे. नगराचे नाव सिंगापूर. चाकरीच्या निमित्ताने लाखोंच्या संख्येने इथे शेकडो देशातील लोक येवून वसलेत.
मी ही त्याच गर्दीतला अंश.
हिंदी मध्ये एक म्हण आहे "कुवा प्यासे के पास नाही आता" वगैरे - यंदाच्या दिवाळीला ही म्हण माझ्यासाठी खोटी ठरली.
मी घरी जावू शकलो नाही त्यामुळे माझे घरंच इकडे सिंगापूरला आले. दिवाळीच्या १० दिवस आधी माझे आई-वडील सिंगापूर नगरी मध्ये दाखल झाले.
आम्ही दिवाळीची तयारी सुरु केली आणि काही दिवसातच गुरुवार उजाडला.
गादीमध्ये लोळत असतानाच माझ्या डोक्यात विचारांचे चक्र सुरु झाले - आज गुरुवार. आज मम्मी, पप्पा दत्ताच्या दर्शनाला जातात - न चुकता. काय करता येईल? आणि तितक्यात मला सुचले - साई बाबा मंदिर :-)
मी माझ्या मनाला समजावले दत्त मंदिर नाही तर ना सही, पण सिंगापूर मध्ये साई बाबा मंदिर तर आहे - या दोघांना तिकडे घेऊन जाऊ.
रूम मधून बाहेर येताच मी त्यांना म्हटलं "चला तयार व्हा, आपण देवळात जायचंय". गुरुवारी सकाळी सकाळी अचानकपणे देवळात जायचं निमंत्रण मिळाल्याने ते दोघेही इतके खुश झाले, कि त्यांनी कुठल्या मंदिरात जायचं हे देखील विचारलं नाही !!
तरीही मी त्यांना सांगितले कि आज गुरुवार आहे त्यामुळे साई बाबांच्या दर्शनाला जाऊया. मग मंदिराची वेबसाईट त्यांना दाखवली. त्या वेबसाईट वरती बाबांच्या मूर्तीचे फोटो होते, तसेच मंदिरातील काही फोटो पण होते. ती सर्व माहिती पाहून झाल्यावर आम्ही निघालो.
साई बाबा मंदिरात आम्ही पोहोचलो तेव्हा नुकतीच आरती झालेली होती, आणि सर्व भाविकांनी प्रसादासाठी रांग लावली होती. आम्ही देखील याच रांगेत उभे राहिलो.
समोर बाबांची प्रसन्न मूर्ती आणि त्या मूर्ती समोर भाविक गात असलेले भजन - यामुळे सगळं वातावरण एकदम मंगलमयी झालेला होतं. रांगे मध्ये पुढे सरकत होतो, तसे गर्दीमध्ये झाकले गेलेले मंदिरातील एक-एक फोटो पाहत होतो. यातले बरेचसे फोटो वेबसाईट वर होते, पण ते इथे परत मंदिरात पाहताना, एक वेगळाच सात्विक आनंद मिळत होता.
पुढे सरकत सरकत जेव्हा आम्ही बाबांच्या मूर्तीच्या एकदम जवळ पोहोचलो, तेव्हा मला अचानक साक्षात्कार झाल्याची अनुभूती मिळाली. त्या बाबांच्या मूर्तीच्या डाव्या बाजूला एक फोटो होता - श्री दत्तात्रायांचा !!
मी या आधी एकदा या मंदिरात आलो होतो - पण हा फोटो तेव्हा पहिल्याचा मला बिलकुल आठवत नाहीये. आणि आज जेव्हा सकाळपासून मी आई-वडिलांसाठी दत्तात्रयाच्या दर्शनासंबंधी विचार करत होतो, अचानकपणे दत्तगुरु आमच्या समोर उभे ठाकले होते.
लहानपणी पासून मी एक वाक्यप्रचार ऐकत आलो आहे - दत्तासारखा प्रकट झाला, दत्त येवूनी उभा ठाकला - आज याची अनुभूती आली.
ही माझ्या आई-वडिलांची पुण्याईच म्हणावी लागेल - भारतात असताना जे पूर्ण भक्ती भावाने प्रत्येक गुरुवारी दत्त दर्शनाला जातात, त्या माझ्या आईवडिलांना दत्तात्रयांनी सिंगापूर मध्ये ही दर्शन दिले. जणू त्या लिटील इंडिया मधील इमारतीमध्ये रत्नागिरी पर्वतच अवतरला त्या दिवशी.
माझ्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर मी एक निखळ आनंदाची छटा पाहत होतो. सिंगापूर मध्ये आल्या नंतर आम्ही बऱ्याच उंच इमारती, अलिशान हॉटेल, सगळं काही फिरलो होतो, पण जे समाधान मी त्या दिवशी दोघांच्या चेहऱ्यावर पाहिले, ते अदभूत होते. आता निदान हे दोघे सिंगापूर मध्ये असे पर्यंत तरी न चुकता प्रत्येक गुरुवारी इथे यायचेच हे मी माझ्या मनाशी पक्के केले.
दत्तात्रयांनी दिलेल्या या दर्शनानंतर मंत्रमुग्ध होऊन आम्ही तिथेच मंदिरात तासभर बसलो - साई बाबांची छान भजने ऐकत, मनातील सर्व क्लेश काही वेळा करता विसरून, स्वतःला हरवून.
आणि जणू या साक्षात्काराला दुजोरा मिळण्यासाठी की काय, जेव्हा आम्ही तिथून निघालो, त्याच वेळी भजन गाणाऱ्या मंडळींनी नवीन भजन सुरु केले - "इतनी शक्ती हमे देना दाता, मन का विश्वास कमजोर हो ना"
|| गुरु देव दत्त प्रसन्न ||