Blog Archive

Sunday, August 11, 2013

घर..

घर. एक शब्द, दोन अक्षरे.
पण या दोन अक्षरात सामावलेला अर्थ शोधता शोधता संपूर्ण आयुष्य निघून जाते.

कोणी म्हणतो जिथे मी तिथे माझे घर, कोणी म्हणतो जिथे माझे आई-वडील ते माझे घर, कोणी म्हणतो जिथे माझी मुले-बाळे ते माझे घर. आजकाल व्हर्चुअल होम हि संकल्पना देखील फार उचलून धरण्यात येत आहे. या घराच्या जितक्या भिन्न व्याख्या, तितक्याच भिन्न परिसीमा.

"हे विश्वचि माझे घर .. " म्हणत संत महंत समस्त समुदाय आपलासा करतात, आणि "अपने घर मे तो कुत्ता भी शेर होता है" अशी डरकाळी फोडीत फिल्मी हिरो स्वतःआची छाप पाडतात.
विषयाचा आवाका मोठा आहे, पण फार लिखाण करणार नाहीये मी इथे; हो पण गेल्या काही दिवसात, जे काही विचार सुचले ते मात्र इथे नमूद करणार आहे.

जगाच्या एखाद्या कोपऱ्यात बक्कळ पैसा हाताशी असताना, तिथल्या अत्याधुनिक सोयी-सुविधा नियुक्त पोलीक्लीनिकच्या शेजारीच घर असताना देखील जर एखादी शिंक आली तर जीव आजारपणाच्या या विचारानेच का घाबरतो? हजारो किलोमीटर दूर आपल्या नातलगांना आणि बऱ्याचदा आपल्या मनाला देखील, आपण बळेच "मी ठीक आहे" असे सतत का सांगत राहतो?

आणि मग "घरी" आल्या आल्या सर्दी, पडसे, डोकेदुखी, ताप, थंडी, घश्याचे-दुखणे असे सगळे काही जरी एकत्र उद्भवले, तरी निर्धास्तपणे, रोजच्या रोज मिळणाऱ्या बिल्लमपल्ली डॉक्टरांच्या गोळ्यांच्या पुरचुंडीच्या बळावर, "दोन दिवसात बरे होऊ" असा विश्वास मनात कुठून उत्पन्न होतो?

जगभरातल्या लोकांना भारतीय जेवणाच्या नावाखाली काही मोजके, प्रसिद्ध आणि चमचमीत असे पदार्थ बनवून खाऊ घातले कि त्यांची वाह-वाही तर मिळते, पण त्या जेवणाच्या पानात कसलीतरी उणीव आहे, असे आपलेच मन आपल्याला का सांगत राहते?

आजारपण म्हटले कि पथ्य हे आलेच.  "तेलकट, तिखट, आंबट, गार काही खाऊ नको" आदेश झाल्यावर चार दिवस रोज वरण-भात-अर्धी भाकरी आणि अगदीच तोंडी लावायला म्हणून थोडीशी भेंडी, कारले, दोडका, कोबी अशी एखादी भाजी. गरम गरम असे हे जेवण आईने वाढले, कि एवढ्यानेच पोट भरून जाते. मनसोक्त "घरचे" जेवण वरण भाताच्या रुपात सुद्धा परिपूर्ण असते. या मागे आईच्या हातची जादू आहे कि घराचे घरपण ?

माझ्यासाठी जिथे माझे आई वडील तिथे माझे घर - असं समीकरण आहे. वर्षातून कधी मी घरी येतो, तर कधी माझ्या कामामुळे असलेल्या मुक्कामाच्या ठिकाणीच मला घरपण लाभते.

मागे कधीतरी एक इंग्रजी वाक्य वाचले होते. माणूस जे काही चांगले, वाईट काम करीत असतो, त्या मागे एकच ओढ असते, एकच अट्टाहास, घरी जाण्याचा..यातच घर या शब्दाची नवलाई दडलेली आहे, नाही का?